आ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन

पुणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री ११-३४ वाजता पुण्यात निधन झालं. ते ६० वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काल रुबी हॉल रुग्णालयात गेले होते.
ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) होते.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.
भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. २०१९ साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी मुळ गावी सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान आ.भारत भालके यांच्या निधनानंतर संपूर्ण मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *