जेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना

मुंगशी प्रतिनीधी: मृग नत्राने बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे . गतवर्षी प्रमाणे यंदाही मुसळधार व भरपूर पावसाचा अंदाज आहे . अतीवृष्टी चा फटका गतवर्षी संपूर्ण बार्शी तालुक्याने अनुभवला आहे . यंदाही तसाच फटका बसतोय की काय याची लोकांच्या मनात भिती असतानाच मुंगशी (वा.) ता. बार्शी येथे शनिवारी १२ रोजी सांयकाळी ८ -९ च्या दरम्यान पावसामुळे कच्च्या रस्त्यावरून जेसीबी विहिरीत पडला आहे.
याबाबत सविस्तर असे की ,मुंगशी ते कळमण रस्ता कच्चा असून पावसामुळे निसरडा बनला आहे . शनवारी १२ रोजी मुंगशी शिवारातील शेतकर्‍याच्या पाईपलाईन खोदाईचे काम करून जेसीबी गावाकडे परतत असताना सांयकाळी ८ -९ वा .दरम्यान निसरड्या रस्त्यामुळे रस्त्यालगतच्या विहिरीत तो पडला .यामध्ये जेसीबी मालक – लक्ष्मण अशोक क्षिरसागर (रा.मुंगशी ) ,ड्रायव्हर – सोमनाथ माळी (रा. कोठाळी ) दोघेही किरकोळ जखमी झाले असून.नशिब बलवत्तर असल्यामुळे वाचले .

पर्यायी पक्का रस्ता नाही


नागझरी नदीतून हा रस्ता कौठाळी- कळमण मार्गे -सोलापूरला जातो . मात्र नदी पात्र कोरडे असतानाच याचा उपयोग होतो ,पावसाळ्यात नाही .शेतकऱ्यांना व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ये-जा करण्यासाठी पर्यायी पक्का रस्ता नसल्याने ही दुर्घटना घडली आहे.

नागझरी नदीवरील बंधार्‍याच्या अर्धवट कामाचा फटका


मुंगशी येथील नागझरी नदीवरील बंधार्‍याचे काम गेल्या चार वर्षापासून शासनाच्या लालफितीत अडकले आहे. त्यामुळे हा बंधारा अर्धवट स्थितीत आहे . या मार्गावर प्रवासी व माल वाहणार्‍या वाहनांची संख्या जास्त आहे.
याच मार्गावरून पुढे मुंगशी, दहिटणे , तडवळे , ढोराळे, आदी गावांचे प्रवासी सोलापूरला जाण्यासाठी मधला शॉर्टकट मार्ग म्हणून निवडतात त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच रहदारी जास्त असते .
पर्यायी पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने व अर्धवट बंधाऱ्याच्या कामामुळे गेल्या वर्षी मुंगशी येथील चार-पाच शेतकरी नदीपात्रात अडकले होते. एक शेतकरी नदी प्रवाहात वाहून गेला . त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी असे मुंगशीतील ग्रामस्थांची मागणी आहे .

गेल्या चार पाच वर्षापासून प्रशासनाच्या लालफितीत बंधाऱ्याचे काम अडकले असून शासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे रखडले आहे . ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून देखील योग्य तो मार्ग निघालेला नाही . तरी शासनाने त्वरित बंधाऱ्याचे अर्धवट काम पूर्ण करावे-
श्री . काशिनाथ क्षीरसागर ग्रामस्थ मुंगशी

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम मुंगशी ते कौठाळी – कळमन या रस्त्यावर घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे . या कामांमुळे अनेक अपघात घडलेत . प्रवाशी व मुंगशी ग्रामस्थांना बंधाऱ्याच्या अर्धवट कामाचा धोका निर्माण झाल्याने हे काम त्वरित व्हावे . – उमेश क्षीरसागर माजी -सरपंच मुंगशी

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *