रद्दी व बुक डेपोला पहाटे आग लागून मालकाचा होरपळून मृत्यू

वैराग : वैराग (ता. बार्शी) येथे रद्दी व्यवसाय व पुस्तकाच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकान मालकाचा होरपळून मृत्यू झाला. सदरची घटना शनिवारी 23 रोजी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास वैराग ग्रामपंचायत कार्यालयाजवळील गुप्ता बुक डेपो येथे घडली. योगेश सीताराम गुप्ता (वय 45, रा. वैराग, ता. बार्शी) असे आगीत होरपळून मरण पावलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद वैराग पोलिसांत झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैराग ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी गुप्ता बंधू हे तीन मजली पुस्तके विक्री व रद्दीचा व्यवसाय करतात व भाड्याने पंढरपूर अर्बन बॅंकेसमोर राहतात. शनिवारी पहाटे तीन वाजता नळाला पाणी येणार असल्याने योगेश गुप्ता हे दुकानात झोपले होते. मात्र पहाटेच्या सुमारास अचानक दुकानात आतून आग लागली. या आगीमुळे पुस्तके, पेपर व इतर साहित्याने पेट घेतल्याने धुराचे लोट उठले.
याबाबत नागरिकांनी लागलीच अग्निशामक दल व पोलिसांना खबर दिली. अग्निशामक दल, पोलिस व ग्रामस्थांनी लोखंडी शटर तोडण्याचा प्रयत्न केला असता शटर तुटले नाही. शेवटी दुकानाची भिंत पाडून आत प्रवेश केला असता आत झोपलेल्या योगेश गुप्ता यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला.
सदरची आग हि दुकानातील शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची खबर मृत योगेश गुप्ता यांचा भाऊ विजयकुमार सीताराम गुप्ता यांनी वैराग पोलिसात दिली आहे. या घटनेचा तपास वैराग पोलीस ठाण्याचे – पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *