समाजकंटकांकडून एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न,विहिंपच्या चौघांना अटक


वैराग (प्रतिनिधी )
सोलापूरहून बार्शीला येणाऱ्या एस टी बसला पानगाव हद्दीत (एम.एच.१४,बीटी-०५०३ ) ५ ते ६ लोकांनी अडवून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला . सदरची घटना शनिवारी सांयकाळी साडेसहा वाजणेच्या सुमारास घडली असून बसच्या समोरील काचेवर विश्वहिंदू परिषदेचा बोर्ड लावणेत आला होता . बार्शी तालुका पोलिस ठाण्यात ४ जणा विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे .

याबाबत बसचालक रामचंद्र सखाराम पवार (वय-५१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पवार व वाहक हनुमंत सुखदेव बुरगुटे ( वय-५३ )हे सोलापूरहून बार्शीला बसमध्ये ४० प्रवासी घेऊन निघाले होते.त्यावेळी बार्शी तालुक्यातील पानगाव या गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या झोटिंग बाबा मंदिराच्या कमानीजवळ गाडी आल्यानंतर ५ ते ६ लोक अचानक गाडी समोर आले.त्यामुळे बसचालकाने गाडी थांबवली असता ते लोक ‘ जय श्री राम ‘ , मंदिरे खुले करा अशा घोषणा देत त्यांनी ड्रायव्हर साइडच्या मागील चाकावर पेट्रोल ओतून टेंभ्याच्या सहाय्याने चाक पेटवून दिले .
एसटीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करून,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सतीश श्रीमंत आरगडे,ऋषिकेश एकनाथ आवटे,संजय विलास आरगडे,दत्ता नागनाथ दळवी यांच्यावर भा.दं.सं कलम-३५३,४३५,३३७,३४१,१४३,१४७,१४८,१४९ नुसार व फौजदारी कायदा अधिनियम १९८३- ७ व सार्वजनिक संपती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ – ३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.डीवायएसपी अभिजीत धाराशिवकर , सपोनि – शिवाजी जायपत्रे,पो.कॉ – तानाजी धिमधीमे,डोंगरे,मंगरुळे,लोहार यांनी घटना स्थळाची भेट देवून पाहणी केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *