जिल्हयातील पहिले ‘अभ्यासाचं गाव’ म्हणून तडवळे ची ओळख

वैराग ( प्रतिनिधी ) कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान आणि बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी तडवळे ( ता. बार्शी ) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून अभ्यासाचं गाव ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यास सुरुवात केली आहे. गावातील मुक्या भिंतीवर शैक्षणिक अभ्यासक्रम सप्तरंग संगतीत रेखाटले जात असून त्या भिंती आता बोलू लागल्या आहेत. त्यामुळे बालचमूंना खेळत बागडत शिक्षण घेता येत असून असा उपक्रम राबवणारे तडवळे ( ता. बार्शी ) हे जिल्ह्यातील पहिले तर राज्यातील दुसरे गाव ठरले आहे….

अनोख्या शैक्षणिक उपक्रमाव्दारे गावच्या भिंती बोलू लागल्या

कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांचे नुकसान झाले त्यात सर्वाधिक हानी हि शैक्षणिक क्षेत्राची झाली आहे. याचा फटका लहान मुलांना बसला असून त्यांची शैक्षणिक प्रगती मंदावली आहे. हसत खेळत शिक्षण मिळावे यासाठी तडवळे गावातील तरुणांनी एकत्र येत अभ्यासाचं गाव ही अभिनव संकल्पना राबवली. या संकल्पनेनुसार अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भित्तिचित्रकांद्वारे शिक्षण दिले जात आहे. गावातील भिंतींवर शैक्षणिक,सामाजिक, ऐतिहासिक, नैसर्गिक असे संदेश रेखाटली जात असून याद्वारे शिक्षण आणि जागृती दोन्ही साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले तडवळे हे गाव बार्शी तालुक्यातील सगळ्यात शेवटचे गाव असून तीन तालुक्यांच्या सीमेवरती वसले आहे. गावांमध्ये दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यावर्षी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला तडवळे गावातील प्रत्येक स्तरातून प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत या उपक्रमासाठी सुमारे दीड लाख रुपयांची आर्थिक मदत स्वच्छेने जमा झाली आहे. युवकांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या संकल्पनेने गावाला शोभा तर आणलीच आहे. पण जागृती ही होत आहे. गावामध्ये तीन अंगणवाड्या, एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एक वस्ती शाळा एक हायस्कूल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण दिले जाते. आज काल वाढदिवस साजरा करण्याचा कल तरुणांचा वाढत आहे या पार्श्वभूमीवर एक भिंत वाढदिवसासाठी रेखाटण्यात आली आहे . यामध्ये मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक सलोखा राखण्यासाठी चे प्रयत्न आणि एक झाड लावून जगवण्याची प्रत्यक्ष कृती या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, वंशावळ, सामाजिक संदेश, लहान मुलांसाठी इंग्रजी मराठी मुळाक्षरे, अंक, पाढे, शास्त्रज्ञ व त्यांचे शोध, खगोलीय ज्ञान, गावाचा इतिहास, व्यसन मुक्ती, स्वच्छता संदेश आदीचे रेखाटन सुरू आहे…

[गावातील ज्या भिंती घराला आधार देत नुसत्याच उभ्या आहेत त्या भिंती ह्या उपक्रमातून शिक्षण देऊन नव्या पिढीला आधार देतील.यातून विद्यार्थ्याना शिक्षण मिळणार असून गावाचा चेहरामोहराही बदलणार आहे……. किरण आवारे… तडवळे ]

[अभ्यासाचं गाव हा उपक्रम पूर्णतः लोकसहभागातून पार पडत असून सुमारे दिड लाख रुपये स्वच्छेने ग्रामस्थांनी दिले आहेत. दररोज तरुणांचा सहभाग आणि मदतही वाढत आहे .दररोज अभ्यासक ही भेट देत आहेत.
राम माने…… तडवळे ]

[या उपक्रमातून गावातील लहान मुलांना शैक्षणिक ज्ञान आणि गावाला सौदर्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे ह्या उपक्रमास मोठे महत्व प्राप्त झाले असून सर्व स्तरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे…. शरद पवार तडवळे ]

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *