वैराग ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा पार्टी प्रमुखांसह ग्रामस्थांचा निर्णय

वैराग (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणूकांचा ज्वर वाढत असताना वैराग नगरपंचायतीची प्रथम उद्घोषणा राज्य शासनाकडून अलिकडेच करण्यात आली आहे.त्यात वैराग ची पंचवार्षिक निवडणूक लागल्याने ह्या निवडणुकीत एकही फॉर्म न भरण्याचा निर्णय प्रमुख तिनही पार्टीसह ग्रामस्थांनी घेतला असुन नगरपंचायतीच्या प्रक्रियेला पाठींबा दर्शविला आहे.
वैरागचे ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज मंदिरामध्ये रवीवारी ग्रामस्थांच्यावतीने बैठक घेण्यात आली . वैराग नगरपंचायत होण्याचा निर्णय झालेला आहे. वैराग प्रमाणे इतर ठिकाणी सध्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशा प्रकारचा पत्रव्यवहार राज्य सरकारकडून, निवडणूक आयोगाला करण्यात आलेला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही आदेश संबंधित ग्रामपंचायतींना केलेला नाही. यामुळे संपूर्ण गावामध्ये नगरपंचायत? की ग्रामपंचायत? निवडणूक असा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे.जर आता ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली तर राज्य शासनाला, व गावाला निवडणुकीसाठी मोठा आर्थिक खर्च होणार आहे. सर्वांचा वेळ वायफळ जाणार आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून गावातील सर्व नागरिक, तिन्ही पार्टीप्रमुख यांनी एक मताने या बैठकीमध्ये गावाच्या हिताचा निर्णय म्हणून वैराग ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून प्रथम उद्घोषणा झाली आहे.यासंदर्भात आक्षेप मागवण्यात आले आहेत. मात्र एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अगोदर तयार केला आहे .त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून यामध्ये वैराग ग्रामपंचायत निवडणूक देखील जाहीर झाली आहे. म्हणून वैराग ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्ष , पक्ष प्रमुख ,कार्यकर्ते व पदाधिकारी ,सामाजिक संघटना, नागरिक यांनी घेतला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *