साश्रू नयनांनी आ.भारत नानांना दिला अखेरचा निरोप

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (६० वर्षे)  यांच्या पार्थिवावर सरकोली येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.
          आ .भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी दुपारी पंढरपूर येथे आणण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे नागरिकांनी गर्दी केली होती. पंढरपूर येथे सरगम चौक, सावरकर चौक, शिवाजी चौक, प्रदक्षिणा मार्ग, कालिका देवी चौक यामार्गे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. विठ्ठल सहकारी साखर कारखाना (गुरसाळे ता.पंढरपूर) व मंगळवेढा येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात आले होते.
         सरकोली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भालके यांना आदरांजली वाहिली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार  प्रशांत परिचारक, संजय शिंदे, यशवंत माने,  प्राणिती शिंदे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार दीपक साळुंखे, नारायण पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, तहसिलदार वैशाली वाघमारे, स्वप्निल मरोड, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह सहकार, राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी पोलीसांच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

आ. भारत भालके यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री – अजित पवार व आदी मान्यवर उपस्थित होते .
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *