बार्शीतील मिलचा भोंगा अद्यापही बंदच, 400 कामगार बेरोजगार

बार्शीतील मिलचा भोंगा अद्यापही बंदच, 400 कामगार बेरोजगार खासदार ओमराजेंनी विशेष लक्ष घालण्याची मागणी

बार्शी( प्रतिनिधी ) केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळातर्फे शहरात सुरू असलेली बार्शी टेक्सटाईल्स मिल्स गेल्या 5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देश ठप्प झाला होता.

मात्र, केंद्र सरकारने अनलॉक तर राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन म्हणत राज्यातील उद्योग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील उद्योग पहिल्याच टप्प्यात सुरू करण्यात आले. मात्र, बार्शीतील 400 कामगारांच्या कुटुंबाचा गाडा चालविणारी मिल अद्यापही बंदच आहे.

त्यामुळे, कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.दिवंगत रावबहादूर गणपतराव झाडबुके (काकासाहेब) यांनी सुरू केलेली जयशंकर मिल, कै. भाऊसाहेब झाडबुके यांनी सांभाळली. बार्शी शहरात राजन मिल, लोकमान्य मिल आणि जयशंकर मिल मोठ्या दिमाखात सुरू होत्या.

हजारो कामगारांचा उदरनिर्वाह या मिलवरच सुरु होता. मात्र, काळाच्या ओघात दोन मिल बंद पडल्या. तर, झाडबुके यांनी केंद्र सरकारकडे ही मिल चालवण्यास दिली. बार्शी टेक्साटाईल्स मिल्स, बार्शी या नावाने ही मिल आजही सुरू आहे.

पण, कोरोना लॉकडाऊनमध्ये सरकारच्या आदेशानंतर बंद झालेली ही मिल अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे, येथे काम करणाऱ्या जवळपास 400 कामगारांच्या कुटुंबाचे भविष्य अंधकारमय झाले आहे.

बार्शी मिलमध्ये सद्यस्थितीत जवळपास 175 कायम, 60 बदली व 140 कंत्राटी कामगार काम करतात. मात्र, गेल्या 5 महिन्यांपासून ही मिल बंद असल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने कायम व बदलीतील कामगारांना 50 टक्केच वेतन दिले जात आहे.

मात्र, कंत्राटी कामगारांना जून महिन्यांपासून वेतन बंद केले आहे. मिल बंद असल्याने कित्येक कामगार इंडस्ट्री इस्टेटमध्ये कामाला जात आहेत, कुणी बिगारी काम करत आहे. तर कुणी मार्केट यार्डात कामाला जातंय. कुणी लहानमोठे व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे.

मिलमध्ये 100 पेक्षा जास्त महिला कामगारही आहेत, त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून आहे. पण, मिल बंद झाल्याने त्यांच्यावरही मोठं संकट कोसळलं आहे. त्यामुळे, लवकरात लवकर मिल सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *